नाशिक

पेपर मिल कंपनीतील माल जळून खाक

नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील एमआयडीसीत धनश्री पेपर रोल कंपनीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील रद्दी पेपर आणि इतर कच्चा माल जळून खाक झाला. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कच्चा माल ठेवला होता त्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. कागदांमुळे आग पसरत गेली. या आगीतील धुराचे लोळ २ किमी अंतरावरूनही दिसत होते. तब्बल १८ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र यात १ लाख टनाहून अधिक माल जळाला.

वडझिरे घाटाजवळ ही कंपनी आहे. त्याठिकाणी कच्च्या मालाची साठवणूक केली जाते. रात्री या कंपनीला आग लागली तेव्हा तात्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. परंतु ही आग भीषण असल्याने सिन्नर नगर परिषद, नाशिक महापालिकेच्या बंबानाही बोलावून घेण्यात आले. धनश्री पेपर रोल कंपनीत पुठ्ठ्यांचे खोके तयार केले जातात. त्यासाठी रद्दीचा पेपर वापरला जातो. पेपरमुळे ही आग जास्तीत जास्त पसरत गेली. त्या आगीच्या गठ्ठ्यात जाणेही कठीण होते. त्यामुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *