तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी
विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना
तळोदा : निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सहकार्याची भूमिका पहिल्या सभेत दिसून आली.
तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षा नंतर तळोदा येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आज घेण्यात आली.या सभेला उपनगराध्यक्ष शितल पाडवी यांच्यासह पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी,भाजपचे गटनेते अजय परदेशी,शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी,नगरसेविका रत्ना चौधरी,जयश्री महाले,अनिता परदेशी,प्रतीक्षा दुबे,प्रतोद शिरीष माळी,हर्षा पाडवी,लक्ष्मी नाईक, गायत्री पिंपरे,मीराबाई कोळी,अरविंद प्रधान कोळी,मोनिका माळी,इमरान खाटीक,अरविंद प्रधान,नदीम बागवान,स्वीकृत नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व गिरधर सागर हे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये अजेंड्यावर एकूण 37 विषय होते.पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक असलेले मोटार पंप, पाइपलाईन साहित्य, टी.एस.एल. आणि ब्लीचिंग पावडर खरेदी करणे तसेच नगरपरिषद अंतर्गत अग्निशमन वाहनांच्या देखभाल व दुरुस्ती करणे.स्वच्छ महाराष्ट्र व स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात जनजागृती मोहीम राबविणे, विविध ठिकाणी स्वच्छतेबाबत सूचना फलक व डिजिटल बॅनर लावणे, बंदिस्त गटारी स्वच्छ करणे तसेच जेटिंग मशीन खरेदी करणे, स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्य खरेदी विषयांवर सकारात्मक निर्णय सभेत घेण्यात आले.
नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती, न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची नियुक्ती तसेच कर्मचारी विषयक प्रशासकीय बाबींवरही सभेत निर्णय सभेत घेतला गेला आहे.याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये रस्ते, गटार, पेवर ब्लॉक बसविणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच नगरपरिषद क्षेत्रातील मोकळ्या जागांचा विकास करण्याबाबत अनेक विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत होणाऱ्या विकासकामांबाबतही चर्चा होऊन विषयांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी कमलेश काळे,रितेश बच्छाव,सचिन अग्रवाल,सनी ठाकरे,सचिन पुळेकर,अश्विन परदेशी,नितीन शिरसाठ,अजय वाघ,नितेश अहिरे यांनी परिश्रम घेतले.
सभेमध्ये केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला गेला. या कामात संबंधित ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात विलंब केला असून ठेकेदारांवर उर्वरित काम पूर्ण करून प्रस्तावित दंडात्मक कारवाई करण्याबाबत सर्वांनमते निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.विषय क्रमांक 25 नुसार प्रभाग क्रमांक तीन मधील एबी सर्कल चे अटल बिहारी वाजपेयी असे नामकरण करण्याबाबतच्या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.यावर माजी नगराध्यक्ष यांनी या सर्कलचे नाव पूर्वीपासूनच माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असून सर्कलला अधिक चांगले व्यापक स्वरूप देऊन सुशोभीकरण करावे,यासाठी वाटल्यास मी माझ्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून देईल असे सांगितले.
बोरवेलच्या एका विषयाला स्थगिती : पहिल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर विषय क्रमांक 22 ला स्थगिती देण्यात आली.या विषयांतर्गत आमदार निधीतून तळोदा नगर परिषद हद्दीतील संगम टेकडी परिसरात मोहन छोटूलाल जोहरी यांच्या घराजवळ महिला शौचालय जवळ कुपनलिका तयार टाकणे,बद्री कॉलनी भन्साली प्लाझाच्या मागे,दादा गणपती नगर, रमणलाल नगर,गोऱ्या हनुमान विद्यानगरी येथे पाडवी हट्टीतील महिला शौचालय शेजारी डी.बी.हट्टी मध्ये गोविंद पाडवी यांच्या घरासमोर, प्रधान हट्टी व प्रताप नगरमध्ये ओपन प्लेसमध्ये कुपनलिका टाकणे, व बारली हट्टी येथे कुपनलिका मोटर टाकणे असे 11 बोरवेल करण्याच्या विषय प्रस्तावित होता. पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी व आरोग्य सभापती रामानंद ठाकरे यांनी हा विषय स्थगित करण्याची सूचना केली.गावात अनेक सार्वजनिक बोअरवेल असून केवळ 33 बोरवेलची अधिकृत नोंद पालिकेकडे आहे. तसेच काही दिवसानंतर पाणीपुरवठा योजना गावात कार्यान्वित होणार असून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी बोरवेल करण्याच्या विषय पुढच्या सभेत मांडून मंजूर केला जाईल,अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली.विरोधकांकडून सर्व सदस्यांनी हा विषय मंजूर करण्याची मागणी बैठकीत केली.मात्र बैठकीत या विषयाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान,या विषयाच्या समर्थनार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरोधकांना हात उंचावून समर्थन करण्याचा सूचना केल्या. त्यावेळी विरोधक शिवसेना-भाजपच्या सर्व १० नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाजूने हात वर केल्याची माहिती देण्यात आली.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




