तळोद्यात घरफोडी; पोलिसांना चोरट्यांचं थेट आव्हान,आयुष्यभराची कमाई लुटली !
सलग दुसरी मोठी चोरीची घटना ; अगोदर मोबाईल दुकान आता घराकडे चोरांचा मोर्चा
तळोदा : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानाची भिंत फोडून तब्बल ५२ लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता चोरट्यांनी थेट एका घरालाच लक्ष्य करत पोलिसांना खुलेआम आव्हान दिले आहे.
तळोदा शहरातील यमुनाई नगर परिसरात रविवारी (दि.१२) पहाटे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ६ तोळे सोन्याचे दागिने आणि ८५ हजार रुपये रोख असा मोठा ऐवज लंपास केला.घरमालक जयसिंग आनंदसिंह गिरासे हे शनिवारी संध्याकाळी पत्नीसह शहादा तालुक्यातील टेंभे येथे सासरवाडीला गेले होते. आज सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात घराचे उघडे कुलूप आणि अस्ताव्यस्त सामान आल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी पोहोचताच जयसिंग गिरासे आणि त्यांच्या पत्नीने आयुष्यभराची कमाई डोळ्यांसमोर लुटली गेल्याचं पाहून अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याने परिसरही हेलावून गेला. संपूर्ण घरातील दोन कपाटे, पलंग आणि सामान चोरट्यांनी उलथापालथ करून नासधूस केली होती.या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तळोदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकीकडे ५२ लाखांच्या मोबाईल चोरीचा तपास सुरू असताना दुसरीकडे पुन्हा घरफोडी झाल्याने चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे आहेत का? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे तळोदा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.तळोद्यात सलग घडणाऱ्या मोठ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरटे वारंवार पोलिसांना खुले आव्हान देत असताना आता केवळ तपास नव्हे तर ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.गुन्हेगारांवर कठोर कारवाई होऊन नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ होणे आवश्यक आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.तळोद्यात सलग घडणाऱ्या मोठ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




