तळोदा, ता. २ : तळोदा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील चिनोदा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्स वाहनाचा आज शुक्रवारी (ता. २) अपघात झाला. या अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी होत अन्य नऊ जणांना दुखापती झाल्या आहेत. दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई टाळण्यासाठी महिंद्रा मॅक्स वाहनाचा चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली. आणि त्यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांचा नातेवाईकांनी केला आहे.
तळोद्याहून महिंद्रा मॅक्स (क्रमांक एमएच १८ आर ९८४) हे वाहन आज शुक्रवारी प्रवासी भरून अलवानच्या दिशेने जात होते. वाहनात अलवान, विहिरीमाळ व पाडली येथील ग्रामस्थ बसले होते. शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गेल्यावर सदर वाहन चिनोदा रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने कविता बोक्या वळवी (वय १८) रा. पाडली, ता. धडगाव हिचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता बाबू राहसे, बगडी रागवी वळवी, सावित्रीबाई रोहिदास पवार, पार्वती लक्ष्मण पवार, माकत्या रूपा डोंगरे, शेवंती दवा वळवी, शकीला दवा वळवी, मुकेश रुपसिंग वळवी, शेवंती रुपसिंग वळवी, बिलीबाई सुरत्या नाईक, जयाबाई सुरत्या नाईक हे जखमी झाले. जखमींना तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रोकडे, गुलाबसिंग पावरा, धरमसिंग वसावे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघाताची माहिती मिळताच मातोश्री जिजाऊ रुग्णवाहिकेचे चालक पुष्पेन्द्र दुबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी आणि कलावती फाउंडेशनच्या रुग्ण सहायता मदत केंद्राचे योगेश मराठे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. नगरसेवक शिरीष माळी, चेतन शर्मा, हितेश शिंदे, बहादुर ठाकरे, योगेश गुरव आणि चेतन गुरव यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली.
आमदार राजेश पाडवी यांच्याकडून जखमींची विचारपूस
दरम्यान,आमदार राजेश पाडवी यांनी देखील तळोदा उपजिल्हा रुग्णालय व नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस करीत त्यांना धीर दिला. यावेळी त्याच्यासोबत स्वीय सहाय्यक दीपक जयस्वाल होते.
RTO ने पाठलाग केल्याचा आरोप
दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन महिंद्रा मॅक्स वाहनाचा मागे लागल्याचा आरोप प्रवाशांचा नातेवाईकांनी केला असून कारवाई टाळण्यासाठी महिंद्रा मॅक्स वाहनाचा चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली. आणि त्यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महिंद्रा मॅक्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली असा दावा जखमींचा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनाने खरोखर पाठलाग केला का? पाठलाग झाला असेल तर तो नियमानुसार होता का? आणि या पाठलागाचा अपघाताशी थेट संबंध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




