तळोदा : शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ व प्रभाग क्रमांक ७ ते ९ मध्ये बसविण्यात आलेल्या सोलर पथदिव्यांचा मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक दिवे सुरुवातीपासूनच बंद पडणे, काही दिवसांतच बॅटरी निकामी होणे तसेच तांत्रिक दोष आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या कामासाठी प्रत्येक प्रस्तावाला ९९ लाख ९९ हजार ८२८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सहा प्रभागांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून सोलर स्ट्रीट लाईट बसविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दिवे कार्यरत नसल्याचे दिसून येत असून, खर्चाच्या तुलनेत कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या कामाचा कार्यारंभ आदेश १० ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला होता. कामावर पाच वर्षांचा दोष दायित्व कालावधी लागू असून त्या काळात देखभाल व दुरुस्ती करणे ठेकेदारांवर बंधनकारक आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पथदिवे बंद असल्याने तळोदा नगर परिषदेकडून ५ जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मी इलेक्ट्रिकल अँड इंजिनियरिंग सर्व्हिसेस व प्रथमेश पावरटेक या एजन्सींना नोटीस बजावण्यात आली होती.
पहिल्या नोटीसनंतर काही ठिकाणी बॅटऱ्या दुरुस्तीच्या नावाखाली काढून नेण्यात आल्या; मात्र महिनाभर उलटूनही त्या परत बसविण्यात आल्या नाहीत. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दुसरी तातडीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर काही ठिकाणी वरवरची दुरुस्ती करण्यात आली; मात्र अनेक भागांतील पथदिवे अद्याप बंद अवस्थेतच असल्याचे चित्र आहे.
फक्त तक्रार आलेल्या ठिकाणीच काम करणे आणि इतर बंद दिव्यांकडे दुर्लक्ष करणे, अशी ठेकेदारांची भूमिका असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोठ्या निधीतून राबविण्यात आलेल्या या योजनेत निकृष्ट कामामुळे भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व बंद पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना दिले आहेत. निर्देशांचे पालन न झाल्यास नियमांनुसार कारवाई करून खर्च ठेकेदारांच्या बिलातून वसूल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




