शहर विकास मिळणार चालना मिळण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय
तळोदा : नगरपरिषदेची सर्वसाधारण दि.११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात असून नवनिर्वाचित सभागृहाच्या सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे.या सभेमध्ये शहरातील मूलभूत सुविधा, विविध विकासकामांना मंजुरी, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता, पथदिवे तसेच प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा होणार असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तब्बल तीन वर्षाच्या प्रशासक कार्यकाळानंतर तळोदा नगर परिषदेवर लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवक विराजमान झाले. तळोदा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता प्रस्थापित करून नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह सर्व समित्यांवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रशासक कार्यकाळ नंतर झालेल्या या सत्तांतरानंतर नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या तळोदा नगर परिषदेच्या या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभेच्या अजेंड्यानुसार तळोदा शहरातील विविध भागांमध्ये कुपनलिका तयार करणे व मोटार बसविणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. भंसाली प्लाझा परिसर, दादा गणपती नगर, रमणलाल नगर, गोविंद नगर तसेच महिला शौचालय परिसर आदीसह विविध भागांमध्ये कुपनलिका तयार करण्याचे प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात येणार आहेत.याशिवाय नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये सोलर पथदिवे बसविण्याचा प्रस्तावही अजेंड्यावर आहे. ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने सोलर पथदिव्यांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच शहरातील एलईडी पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच नवीन लाईट बसविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबत चर्चा होणार आहे.
पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक असलेले मोटार पंप, पाइपलाईन साहित्य, टी.एस.एल. आणि ब्लीचिंग पावडर खरेदी करण्याबाबतही सभेत विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद अंतर्गत अग्निशमन वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.स्वच्छ महाराष्ट्र व स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात जनजागृती मोहीम राबविणे, विविध ठिकाणी स्वच्छतेबाबत सूचना फलक व डिजिटल बॅनर लावणे, बंदिस्त गटारी स्वच्छ करणे तसेच जेटिंग मशीन खरेदी करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. तसेच स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्य खरेदीबाबतही चर्चा अपेक्षित आहे.
नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती, न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची नियुक्ती तसेच कर्मचारी विषयक प्रशासकीय बाबींवरही सभेत निर्णय घेतला जाणार आहे.याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये रस्ते, गटार, पेवर ब्लॉक बसविणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच नगरपरिषद क्षेत्रातील मोकळ्या जागांचा विकास करण्याबाबत अनेक विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत होणाऱ्या विकासकामांबाबतही चर्चा होणार आहे.
काही विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता
सभेमध्ये केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला जाणार असून संबंधित कामांमध्ये झालेल्या विलंबाबाबत ठेकेदारांवर कारवाई तसेच पुढील कामकाजाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.विषय क्रमांक 25 नुसार प्रभाग क्रमांक तीन मधील एबी सर्कल चे अटल बिहारी वाजपेयी नामकरण करणे याबाबत विचार विनिमय करण्याचा विषय सभेत प्रस्तावित आहे. या सभेमध्ये हा वादग्रस्त ठरू शकतो. माजी नगराध्यक्ष अजय परदेसी यांनी ए बी सर्कलची निर्मिती केली असून एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे अटल बिहारी सर्कल असे या सर्कलचे नाव असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.तरी देखील बैठकीच्या अजेंड्यामध्ये हा विषय समाविष्ट करण्यात आल्याने यामागे राजकीय गोची असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे या विषयावर बैठकीत वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अजेंड्यावर एकूण 37 विषय
पहिल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर तब्बल विषय आहेत यातील सर्व विषय विकास कामांचा संबंधित दिसून येत असले तरी काही विषय विवादास्पद व वादळी ठरण्याची देखील शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडे नगराध्यक्षांसह एकूण 11 नगरसेवकांचे बहुमत आहे तर भाजप,शिवसेना युतीकडे देखील १० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर सातच्या चुकीच्या मुद्द्यांवर विरोध अशी भूमिका विरोधकांनी अगोदरच जाहीर केली असली तरी प्रत्यक्ष पहिल्या सर्वसाधारण सभेत काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्यासाठी देखील पहिली सर्वसाधारण सभा ही आव्हानात्मक ठरणार असून विरोधकांना देखील सोबत घेऊन सभागृह चालवण्यासाठी त्यांच्या क्षमतेचा कस लागणार असे चित्र आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




