गुन्हेगारी तळोदे स्थानिक वार्ता

प्रकल्प कार्यालयात  अधीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा, पोलिसांत गुन्हा


तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील प्रकल्प कार्यालयात दारूच्या नशेत येऊन आरडाओरड व दमदाटी केल्याप्रकरणी संग्राम मारोती परसोडे (अधीक्षक, शासकीय आश्रमशाळा सरी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.
     याबाबत तक्रारदार तुषार राम दुर्वे (वय २९), कनिष्ठ लिपिक, प्रकल्प कार्यालय तळोदा यांनी फिर्याद दिली आहे. बांधकामासंदर्भात माहिती विचारण्यासाठी परसोडे यांना कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र ते दारूच्या नशेत कार्यालयात येऊन मोठ्याने आरडाओरड, शिवीगाळ तसेच दमदाटी करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम २९४ (अश्लील कृत्य/शब्द), ३५२ (मारहाण/हल्ला), ३५३ (शासकीय कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनोद नाईक पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, शासकीय कार्यालयात अशा प्रकारे दारूच्या नशेत गोंधळ घालण्याच्या घटनेमुळे प्रशासकीय शिस्त व कार्यालयीन वातावरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपासातून संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *