तळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी स्वतः मैदानात उतरून क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला. क्रिकेट सामन्यात भर दुपारच्या उन्हात त्यांनी आठ षटकांसाठी पूर्णवेळ क्षेत्ररक्षण केले आणि त्यानंतर फलंदाजीसाठीही मैदानात उतरले. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पथराई (जि.नंदुरबार) येथील के.डी.गावित शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर शनिवारी सकाळी या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अनय नावंदर होते. यावेळी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव विभूती गावित, नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी संघटनेच्या सचिव ऋक्षिका गावित, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड, उत्तम राऊत, देवेंद्र वाणी, अरविंद वळवी, बबन मुगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, बुद्धिबळ अशा विविध सांघिक व व्यक्तिगत क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. तालुकानिहाय शासकीय व अनुदानित अशा गटांमध्ये सामने खेळवण्यात आले. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नाशिक विभागात अशा प्रकारे आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये तळोदा प्रकल्प हा पहिला असल्याची माहिती प्रास्ताविकात बबन मुगळे यांनी दिली.
मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने या क्रीडा स्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरल्या आहेत.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




