बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकल्पाचे कंत्राट ‘सॅम इंडिया’ या कंपनीकडे असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारी परिसरात एकटी असलेल्या मुलीला आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५, रा. पलामू, झारखंड) याने फूस लावून जवळील झोपडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. दरम्यान, संध्याकाळी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात सतर्कता अलर्ट जारी केला.
बसस्थानके व रेल्वे स्थानकांत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करीत आहेत.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

