छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

जिल्हा परिषद निवडणूक: मतदारांच्या रांगा वगळून इतर ठिकाणी जमावबंदीचे आदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी, कर्मचारी व मतदान करण्यासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात व आत कोणत्याही व्यक्तीस मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट वापरण्यास, मतदानाची गोपनीयता भंग होईल अशी कृती करण्यास बंदी आहे.

मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी यांना मोबाइल वापरण्यास व फोटो काढण्यास मनाई असणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी वगळून कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे बाळगण्यास, परवानगी दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त वाहनांचा वापर करण्यास, निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, ठराविक उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, ज्वलनशील, स्फोटक पदार्थ बाळगणे, मनुष्य व मतदान यंत्राला हानी पोहोचू शकेल अशी वस्तू नेण्यास मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *