Uncategorized

तळोदामध्ये शनिवारी ‘स्वप्न स्वामी विवेकानंदांचे’ व्याख्यान
निम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिरीषकुमार शिंदे यांचे आयोजन


तळोदा : शहराचे सुपुत्र तथा नंदुरबार येथील निम्स हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शिरीषकुमार शिंदे यांच्या वतीने आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्वप्न स्वामी विवेकानंदांचे’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हातोडा रोडवरील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
तळोदा शहरात लहानाचे मोठे झालेल्या डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या शहरातील शिक्षक आणि नागरिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा वैचारिक उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. शिंदे यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. स्वामीजींनी आयुष्याच्या पूर्वार्धात देव व धर्माचा घेतलेला शोध, शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत तत्त्वचिंतक म्हणून मिळवलेली जागतिक कीर्ती आणि उत्तरार्धात भारताच्या विकासासह दरिद्रनारायणाच्या सेवेसाठी पाहिलेले सुखी समाजाचे स्वप्न यावर ते या व्याख्यानातून प्रकाश टाकणार आहेत.
“चला सुविचारांचे दीप प्रज्वलन करून ज्ञानाची दिवाळी साजरी करूया,” असा संदेश देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नव्वदीच्या दशकात तळोदामध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींच्या ‘नब्बे के डिब्बे’ या समूहाचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले आहे. या व्याख्यानाचा तळोदा शहर व परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *