खानदेश तळोदे नंदुरबार साप्ताहिक वृत्तपत्र स्थानिक वार्ता

रांझणी फाट्याजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मोटारसायकलला प्रवासी ॲपे रिक्षाची जोरदार धडक; मोठा धनपूर परिसरात शोककळा

तळोदा : तळोदा शहराच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला प्रवासी ॲपे रिक्षाने जोरदार धडक दिल्याने रांझणी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी (ता. २५) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडलेल्या या अपघातात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवरील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले. या घटनेने मोठा धनपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, छोटा धनपूर येथील तीन तरुण यामाहा मोटारसायकलवरून तळोद्याच्या दिशेने येत होते. दरम्यान, तळोद्याहून पुढे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या प्रवासी ॲपे रिक्षासोबत रांझणी फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

       या अपघातात राज रवी पाडवी (वय १७, रा. मोठा धनपूर) याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राज हा तळोदा येथील महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता. लहान वयातच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

      अपघातात लकी मंगलसिंग पाडवी (वय २१, रा. मोठा धनपूर) हा जखमी झाला असून, त्याच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर निलेश वीरसिंग पवार (वय १८) याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर काळ्या रंगाची ॲपे रिक्षा घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षाचालकाने कट मारल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी अपघाताचे नेमके कारण आणि रिक्षाचालकाची माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *