ठाणे

“आपला माणूस” अशी ओळख निर्माण केलेले कर्तृत्ववान खासदार – डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्याला नेहमीच अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा लाभली आहे. हीच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा पुढे नेत शिवसेनेचे तरुण, ऊर्जावान आणि अभ्यासू खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकुशलतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या डॉ. शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रभावित केले आहे. आणि याचमुळे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” महाराष्ट्राचे भाऊ ” म्हणून संबोधले.

भारत – पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी केंद्र सरकारने विविध देशांत शिष्टमंडळे पाठवली होती. त्या प्रतिनिधीमंडळात डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश असणे हे त्यांच्या विश्वासार्हतेचे आणि राष्ट्रीय पातळीवरील योगदानाचे द्योतक ठरले.

ठाणे व नवी मुंबईच्या तुलनेत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ ही शहरे अनेक वर्षे विकासाच्या शर्यतीत मागे राहिली होती. दोन महापालिका, एक नगरपालिका आणि झपाट्याने नागरीकरण होत असलेली अनेक शहरे असा व्यापक परिसर असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी डॉ. शिंदे यांच्यावर आली. सुमारे १२ वर्षांपूर्वी खासदार म्हणून सूत्रे स्वीकारताच त्यांनी नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने कामाला सुरुवात केली.

कोणताही विषय असो आधी सखोल अभ्यास आणि मगच ठोस मांडणी ही त्यांची कार्यशैली. त्यामुळे संसदेत त्यांची उपस्थिती कायम लक्षवेधी राहिली आहे. सुमारे ८० टक्के उपस्थिती, तिसरी सलग टर्म, पहिल्या दोन टर्ममध्ये ११६ चर्चांमध्ये सहभाग, ५७४ प्रश्न उपस्थित करणे आणि १२ खासगी विधेयके मांडणे ही आकडेवारी त्यांच्या कार्यतत्परतेची साक्ष देते.

पायाभूत सुविधांना गती, शहरांना नवे रूप

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे मतदारसंघात विकासाची चाके वेगाने फिरू लागली. रेल्वे, मेट्रो, रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि पर्यायी मार्गांची उभारणी यामुळे संपूर्ण परिसराला नवे स्वरूप प्राप्त होत आहे. कल्याण – तळोजा मेट्रो, ऐरोली – काटई फ्रीवे, कल्याण – शिळफाटा रस्ता रुंदीकरण, कल्याण फाटा व मुंब्रा उड्डाण पूल, शीळफाटा सहापदरी उड्डाण पूल, कल्याण रिंगरोड, मोठागाव – माणकोली उड्डाण पूल, विठ्ठलवाडी – कल्याण उन्नत मार्ग, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, काटई – अंबरनाथ मार्गाचे काँक्रिटीकरण, डोंबिवलीतील निवासी व औद्योगिक विभागातील रस्ते अशा असंख्य प्रकल्पांनी वाहतूक सुलभ झाली आहे.
सांस्कृतिक वारसा आणि नागरी सुविधा

भौतिक विकासाबरोबरच सांस्कृतिक संवर्धनालाही त्यांनी प्राधान्य दिले. अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण, डोंबिवलीजवळील खिडकाळी मंदिराचा विकास व वार्षिक शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल, श्री मलंग गड परिसरातील सुविधा व फ्युनिक्युलर प्रकल्प, दिवाळी पहाट संगीत मैफिली, अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, कल्याण पूर्व विभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञानकेंद्र, दिव्यात आगरी – कोळी – वारकरी भवन, डोंबिवलीतील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह आणि कल्याणमधील हिंदी भाषी भवन हे सर्व प्रकल्प त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहेत.

रेल्वे प्रवाशांना दिलासा

कल्याण – बदलापूरदरम्यान तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका प्रगतीपथावर असून अंबरनाथ – बदलापूरदरम्यान नवे चिखलोली स्थानक उभारले जात आहे. डोंबिवली, ठाकुर्ली, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. कल्याण स्थानकाच्या रिमॉडेलिंगमुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा कमी होत आहे.

आदर्श लोकप्रतिनिधी

खरा लोकप्रतिनिधी तोच, जो निवडणुकीपुरता नव्हे तर कायम जनतेत राहतो. डॉ. श्रीकांत शिंदे हे अशाच लोकाभिमुख नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. ते नियमितपणे वस्त्यांमध्ये, गावांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधतात. पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सेवा, शाळा, रेल्वे समस्या, महिलांची सुरक्षितता असो किंवा एखाद्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न ते स्वतः लक्ष घालतात. पूरस्थिती, अपघात किंवा आपत्तीच्या वेळी ते प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला गती देतात. गरजू कुटुंबांना मदत, उपचारासाठी पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांशी थेट समन्वय ही त्यांची नेहमीची कार्यपद्धती आहे.

ते केवळ तक्रारी ऐकून थांबत नाहीत, तर काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात. अनेकदा जागेवर जाऊन पाहणी करणे, डेडलाईन ठरवणे आणि पुन्हा प्रत्यक्ष तपासणी करणे या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले.

तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकास, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा, ज्येष्ठांसाठी सुविधा आणि व्यापारी उद्योजकांसाठी पायाभूत सोयी समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संवाद आहे. संसदेतही ते मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी ठामपणे आवाज उठवतात आणि अभ्यासपूर्ण मांडणी करतात.

अनुभवातून आलेली अचूकता

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्य बहुआयामी आहे. मागील दोन टर्मप्रमाणेच सध्याच्या तिसऱ्या टर्ममध्येही त्यांची विकासगती तितकीच जोमदार आहे. दहा वर्षांच्या अनुभवामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये अधिक नेमकेपणा आणि परिणामकारकता आली आहे. विकासकामांबरोबरच माणुसकी जपणारा हा नेता संकटात आधार बनतो आणि आनंदाच्या क्षणी नागरिकांसोबत उभा राहतो. म्हणूनच लोक त्यांना केवळ खासदार म्हणून नव्हे, तर “आपला माणूस” म्हणून ओळखतात.

आजच्या राजकारणात अशी लोकाभिमुख, संवेदनशील आणि कामाला प्राधान्य देणारी नेतृत्वशैली दुर्मीळ आहे. पण डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सिद्ध केले आहे की लोकप्रतिनिधी हा पदापुरता मर्यादित नसतो तो समाजाचा आधारस्तंभ असतो. जनतेत राहून, जनतेसाठी झटून आणि विकासाला मानवी स्पर्श देत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात विश्वासाचे मजबूत बंध निर्माण केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *