अहिल्यानगर (अहमदनगर)

पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल

शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून, तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. विशाल हा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली.

अखेर संशय बळावल्याने तत्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरवाजा तोडला आणि आत विशाल लटकलेल्या अवस्थेत दिसला

पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाइलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा तपास सुरू आहे. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *