तालुक्यातील दाभड येथे ७५ वर्षीय पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या होऊन आठवडा उलटला, तरी आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी दाभड येथील शेकडो ग्रामस्थांनी अर्धापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनावर धडक मोर्चा काढला. “आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नेमकी घटना काय? गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) पार्वतीबाई नेहमीप्रमाणे सकाळी शेताकडे गेल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दाभड शिवारातील एका विहिरीजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. अज्ञात नराधमाने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची क्रूर हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.तपासावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थ आक्रमक
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला, फॉरेन्सिक टीम पाचारण केली, मात्र आठवडा होऊनही हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. परिसरातील एका हॉटेलमधील संशयित नोकरही घटनेपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे, तरीही पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. तपासाची चक्रे संथ गतीने फिरत असल्याचा आरोप करत आज सकाळी ११ वाजता दाभडमधील सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील नागरिक एकत्र आले.
महिलांच्या सुरक्षेसाठी आक्रमक मागणी
मोर्चादरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल ६०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. “परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा आणि मारेकऱ्याला तात्काळ गजाआड करा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलिसांनी तपासाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी आरोपीला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

