गडचिरोली

‎ट्रकच्या धडकेत वडिलांचा जागीच अंत, मुलगा गंभीर; ‎​आरमोरी येथील घटना

आरमोरी तालुक्यातील आकापूर येथून नातेवाईकांकडे भेट देऊन परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. किटाळी चौकात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले.

‎​तुळशीदास रामाजी सहारे (५४, रा. देऊळगाव ता. आरमोरी) असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा विरेंद्र तुळशीदास सहारे (३०) आणि दिलीप सोमा टेकाम (४८) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सहारे पिता – पुत्र आणि त्यांचे मित्र आकापूर येथून काम आटोपून आपल्या देऊळगाव घराकडे दुचाकीने परतत होते. किटाळी चौकात येताच समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुळशीदास सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे देऊळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी सांगितले.

‎‎​रस्ता की मृत्यूचा सापळा?

‎​किटाळी चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रकची मोठी रांग लागलेली असते. या उभ्या ट्रकमुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या उभ्या ट्रकवर कारवाई केलेली नाही. आजचा बळी हा प्रशासनाच्या याच दुर्लक्षित धोरणामुळे गेल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *