आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अंभोरा पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी असून, यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अशी होती चोरीची पद्धत, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ही टोळी गडावरील गर्दीचा फायदा घ्यायची. महिला भाविकांना धक्काबुक्की करणे, बोलण्यात गुंतवणे किंवा गळ्यात हात टाकून हातचलाखीने दागिने लंपास करणे, अशी यांची पद्धत होती. १९ डिसेंबर २०२५ रोजी या संदर्भात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे पाथर्डी येथील सुधीर कराळे याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. या मोहिमेत पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आदिनाथ भडके, हरिभाऊ बांगर, कृष्णा नरवडे आणि जयराम उबे यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




