कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मतदारसंघांमध्ये निर्बंध, मतदान केंद्र परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध, मतमोजणी केंद्र परिसरात कलम १६३ लागू यासह निकालानंतर मिरवणूक, रॅली, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम, फटाके व गुलालावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान व सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम लावणे, मोटारसायकलचे सायलेन्सर काढून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके फोडणे यावर बंदी आहे.
मतदारसंघामध्ये हे नियम
– लाऊड स्पिकरचा वापर परवानगीशिवाय नाही.
– मतदान केंद्राजवळील धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्थांजवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही. प्रचार करणे, मतदारावर ठरावीक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर, आचारसंहिता भंग होईल, अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करणे.
– मोटारगाड्या, वाहने तीनपेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात असू नये.
– मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध
– मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बूथ स्थापन करणे.
– मतदार नसलेले राजकीय पक्षप्रमुख व कार्यकर्ते ४८ तासांपर्यंत गावात वास्तव्य करू शकणार नाही.
– मतदान केंद्रामध्ये मोबाइल वापरणे, फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे.
– मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरात प्रवेश बंद
आजपासून जमावबंदी
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर गुरुवारी रात्री १० वाजल्यानंतर शनिवारी मतदान संपेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे यावर बंदी घातली आहे. मात्र पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम व निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी यांना हा नियम लागू नसेल.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




