विद्यार्थी कॉर्नर

२०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गोव्यातील शाळांचे वेळापत्रक सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. गोवा शालेय शिक्षण नियम १९८६ मधील नियम २१ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी साठी सत्र, सुट्टया व विविध ब्रेक्स निश्चित करण्यात आले असून, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहीर वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्षाचा पहिला सत्र १ एप्रिलपासून सुरू होऊन १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र १२ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २४ मार्चपर्यंत चालणार आहे. या कालावधीत अभ्यासक्रम, परीक्षा तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, हे वेळापत्रक गोव्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी लागू राहील.
शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपापले नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुढील वर्षाचे नियोजन करणे सोपे होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध सणांनिमित्त सुट्ट्यांचाही तपशील जाहीर करण्यात आला आहे. गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान सुट्टी राहणार आहे. दिवाळीची सुट्टी २ ते २१ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

नाताळ सणानिमित्त २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान शाळांना सुट्टी राहील. याशिवाय, उन्हाळी सुट्टी १ मेपासून सुरू होऊन ५ जूनपर्यंत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत शाळा बंद राहतील आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी केली जाईल.

अशा असतील सुट्टया

– गणेश चतुर्थी : १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६
– दिवाळी : २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६
– नाताळ : २४ डिसेंबर २०२६ ते २ जाने. २०२७
– उन्हाळी : १ मे ते ५ जून २०२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *