राजकारण

सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले

मुंबई: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे.

अंजली दमानिया यांनी असा आक्षेप घेतला होता की, सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत. खासदारकीचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याशिवाय त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही. तसेच, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.तटकरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “आम्हाला तांत्रिक बाबींचे पूर्ण भान आहे. १९९१ मध्ये शरद पवार आणि स्वतः अजित पवार यांची उदाहरणे आहेत. सदस्य नसतानाही एखादी व्यक्ती सहा महिने पदावर राहू शकते, सुनेत्रा पवारांचे पद कोणत्याही धोक्यात नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनानंतर (जानेवारी २०२६) अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याने टीका झाली होती. यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की, शपथविधी तातडीने झाला नसून, ७२ तासांनंतर आणि सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनच पार पडला आहे. अंत्यसंस्काराआधीच मुलाखती देऊन विलीनीकरणाची हवा निर्माण करण्यामागे नेमका काय उद्देश होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तटकरे यांनी एबीपी माझाला ही मुलाखत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *