स्व. शांताबाई चंद्रसिंग गिरासे यांचा जीवनप्रवास समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. धुळे येथील सूर्यवंशी कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई यांचा विवाह चंद्रसिंग गिरासे यांच्या कुटुंबात झाला. त्यांच्या पतींच्या नोकरी निमित्त ते तळोदा येथे स्थायिक झाले. तळोदा हा मुख्यतः आदिवासी पट्टा असून, येथील गोरगरीबांची स्थिती पाहून शांताबाई यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला.
शांताबाई यांनी (परचारिका) म्हणून 35 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली. अक्कलकुवा, सोमवाल, अक्रांणी, तळोदा, आणि नवापूर असे नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी निःस्वार्थ सेवा केली. त्यांनी रुग्णसेवेच्या कार्यात कधीही जात, धर्म, किंवा आर्थिक स्थितीचा भेदभाव केला नाही. त्यांच्या मनमिळावू व समर्पित स्वभावामुळे त्या केवळ रुग्णालयातच नव्हे, तर लोकांच्या घरांमध्येही परिचित होत्या. लोक त्यांच्या घरीही हक्काने सेवा घेण्यासाठी येत असत, आणि त्या कुणालाही निराश करत नसत.
शांताबाई यांच्या पती, चंद्रसिंग गिरासे, पंचायत समितीत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. २००९ साली त्यांच्या पतींचे निधन झाले. या कठीण प्रसंगानंतरही त्यांनी हताश न होता, आपले आयुष्य आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार घडवत त्यांना चांगले शिक्षण दिले. आज त्यांच्या तीन मुलांपैकी – मोठा महेंद्र, मधला मानसिंग, आणि धाकटा अजय – हे तिघेही समाजात चांगल्या प्रतिष्ठेने आपले जीवन जगत आहेत.
शांताबाई यांची ओळख केवळ परिचारिका म्हणून नव्हे, तर आदिवासी, दलित आणि गोरगरिबांसाठी आधारस्तंभ म्हणून होती. त्यांनी अनेकांचे जीवन सुसह्य केले, त्यामुळे त्या “सर्वांच्या शांताबाई” म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांची सेवा फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती, तर समाजात शांततेचे आणि एकात्मतेचे कार्य करण्यासाठी त्या नेहमी पुढे असत.
त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, मनमिळावू आणि सर्वांना समाविष्ट करून घेणारा होता. त्यांनी फक्त आपला परिवारच नव्हे, तर समाजातील अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यांच्या सुना आणि नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आजही त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवत आहे.
दीर्घकालीन आजाराशी झुंज देत, आज, दिनांक ३ डिसेंबर रोजी, स्व. शांताबाई चंद्रसिंग गिरासे यांच्या जीवनप्रवाहाचा शेवट झाला. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, आणि समाजसेवेचा एक उज्ज्वल दीपस्तंभ कायमचा मावळला.त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबावर शोक कळा पसरली असून, आईचा गेल्यामुळे महेंद्र मानसिंग व अजय यांचे छत्र हरपले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




