मुंबईतील कफ परेड परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय दिव्यांग तरुणीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ऐकू किंवा बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत, गेल्या काही महिन्यांपासून नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होत. अखेर डीएनए तपासणीत गर्भातील भ्रूणाचा जैविक संबंध वडिलांशी जुळल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2026 रोजी आलेल्या डीएनए तपासणी अहवालात गर्भातील भ्रूणाचा डीएनए पीडितेच्या वडिलांशी पूर्णपणे जुळला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात इतर संशयितांची भूमिकादेखील तपासात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान, पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी एका प्रौढ व्यक्तीला अटक केली होती, तसेच 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. पीडितेने हातवाऱ्यांद्वारे या दोघांची ओळख संशयित म्हणून करून दिली होती. एकूण 17 संशयितांचे डीएनए आणि रक्त नमुने घेण्यात आले. भ्रूणाच्या जेनेटिक डेटाशी तुलना केल्यानंतर फक्त एकच पॉझिटिव्ह मॅच आढळून आला, जो पीडितेच्या वडिलांचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोटदुखीच्या तक्रारीतून प्रकरण उघडकीस
सप्टेंबर 2025 मध्ये पीडित तरुणीने आपल्या आजीकडे पोटदुखीची तक्रार केली होती. हाताच्या खुणांद्वारे तिने पोटात काहीतरी रेंगाळत असल्याची भावना व्यक्त केली. यानंतर तिला मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
तक्रार नोंदवण्यासाठी समुपदेशनाची गरज
पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला पीडितेला संवाद साधण्यात अडचणी येत होत्या आणि ती तक्रार देण्यासही तयार नव्हती. या दरम्यान पोलिसांनी तिच्या वडिलांशी चौकशी केली असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि तक्रार नोंदवण्यास विरोध केला. मात्र, समुपदेशनानंतर पीडिता तक्रार नोंदवण्यास तयार झाली, त्यानंतर तपासाला गती मिळाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा लैंगिक अत्याचार मार्च 2025 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान झाल्याची शक्यता आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




