अभिवादन नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव

शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर

तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा, परंपरांचा आणि शौर्यपर इतिहासाचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना घेता येणार आहे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला आणि पराक्रमाला अभिवादन करणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी सादर होणार आहे.

गाथा शिवरायांची व शिव स्वरांजली चे आयोजन:
दि. १९ फेब्रुवारी रोजी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लोकशाहीर शिवाजीराव पाटील यांच्या ‘गाथा शिवरायांची’ या शाहीरी पोवाड्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवचरित्रातील थरारक प्रसंग आणि स्वराज्य स्थापनेची गाथा पोवाड्यांच्या ओजस्वी सादरीकरणातून जिवंत होणार आहे. तसेच ओमकार संगीत साधना विद्यालयाचे हेमंत पाटील व सहकारी ‘शिव स्वरांजली’ या संगीतमय कथेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर करणार आहेत.

विविध स्पर्धांचे आयोजन:
या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. भव्य रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याची ‘किल्ले बनवा’ स्पर्धा अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीते आणि पोवाडे सादर करून युवा पिढीत इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे स्थानिक कलाकार गौरव माळी यांची 3D-2Way रांगोळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आणि प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून साकारले जाणार असून, हा अभिनव उपक्रम शालेय विद्यार्थी व शिवप्रेमींमध्ये गड-किल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृतीची जाणीव अधिक दृढ करणार आहे.

हा द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वगुणांना विविध कलात्मक उपक्रमांतून वाहिलेली आदरांजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *