मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार
नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभ
तळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या
मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करण्यात येणार आहेत.
हा उपक्रम १ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे राबविण्यात सुरुवात झाली असून ३ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची अधिकृत घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आली.नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यात जन्मलेल्या ६ नवजात मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपयांची अनामत रक्कम बँकेत एफडी स्वरूपात जमा करण्यात आली आहे. या माध्यमातून मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देत समाजात मुलींविषयी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा संदेश दिला जात आहे.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पॅनल प्रमुख योगेश चौधरी,उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, डॉ. शैलेश पटेल, माजी सभापती भरत गावित, रतन पाडवी, माजी जीप सदस्य मोहन शेवाळे, महिला आघाडीच्या मालती वळवी, माजी पंचायत समिती सभापती यशवंत पाडवी, नगरसेवक रामानंद ठाकरे, कल्पेश चौधरी, इम्रान खाटिक, अरविंद प्रधान यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




