तळोदे महाराष्ट्र स्थानिक वार्ता

मेवासी वन विभागातील संबंधित वनपालावर कारवाई करा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गावजोड रस्ता व साकव पुल बांधकाम त्वरित करण्याची मागणी

तळोदा :  तालुक्यातील कुवलीडाबर व पाल्हाबार येथील ग्रामस्थांनी गावाला जाण्यासाठी रस्ता व साकव पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच मेवासी वन विभागातील संबंधित वनपालावर कारवाई करावी, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
      निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दोन्ही गावांपर्यंत आजपर्यंत कच्चा किंवा पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने गावजोड रस्ता व साकव पुलास मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. भारत सरकारच्या २००६ च्या वनअधिकार कायद्यानुसार कलम ३ (२) अंतर्गत भौतिक सुविधांसाठी आवश्यक प्रस्ताव परिपूर्ण करून मेवासी वन विभाग, तळोदा येथे सादर करण्यात आला होता. मात्र संबंधित वनपाल जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून गावकऱ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
        गावात एखादी गर्भवती महिला किंवा गंभीर आजारी व्यक्ती असल्यास रस्ता नसल्यामुळे खांद्यावरून पायपीट करत रुग्णाला बाहेर आणावे लागते. शासकीय कर्मचारीसुद्धा रस्ता नसल्यामुळे गावात पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत.
        यापूर्वी वन विभागाची रितसर परवानगी घेतलेली असून ग्रामस्थ २००५ पूर्वीपासूनचे रहिवासी असल्याने कायद्यानुसार सर्व योजनांसाठी पात्र असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून कुवलीडाबर व पाल्हाबार गावजोड रस्ता व साकव पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनाची प्रत आमदार राजेश पाडवी,तळोदा तहसिल,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तळोदा,गटविकास अधिकारी तळोदा यांना देण्यात आली आहे.
          निवेदनावर रापापूरचे सरपंचा प्रितीमा विक्रम वळवी, उपसरपंच मैथुन मोजा पाडवी,खाअल्या वसावे,विलास पाडवी,भोग्या  पाडवी,गोमा पाडवी,नरपत पाडवी,इला जातच्या पाडवी,दिलीप पाडवी, आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *