खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक

नंदुरबार एसपींचा कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद तर बोरद येथे हिस्ट्रीशीटरची परेड

पोलीस अधीक्षिकांची तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद दूरक्षेत्रांना भेट

तळोदा  :  पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद येथील पोलीस दूरक्षेत्रांना भेट देऊन पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पोलीस ठाण्यातील अभिलेखांची तपासणी केली, प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाची माहिती जाणून घेतली. तसेच कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद साधला, तर बोरद येथे हिस्ट्रीशीटरची परेड घेऊन त्यांना यापुढे गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या.
        यावेळी पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी सर्वप्रथम तळोदा पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध दस्तऐवज, रजिस्टर व अभिलेखांची तपासणी केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेत तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करण्यासह पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाबाबतही त्यांनी माहिती घेतली.
      त्यानंतर त्यांनी कोठार व बोरद येथील पोलीस दूरक्षेत्रांना भेट दिली. कोठार येथे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांशी विविध विषयांवर संवाद साधत परिसरात गुन्हेगारी घटना घडू नयेत, यासाठी सतर्क राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच परिसरातील आदिवासी लोकजीवन, विविध सण-उत्सव, परंपरा आणि महत्त्वाच्या स्थळांविषयी त्यांनी ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.
      यावेळी त्यांनी परिसरातील गावांचा आणि गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला. ज्या गावांमध्ये सातत्याने गुन्हे घडतात, अशा गावांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती व समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळी परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावामुळे किरकोळ चोऱ्या व अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी जनजागृती व प्रबोधन करावे, तसेच सुदृढ पिढी घडविण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
      

बोरद येथे हिस्ट्रीशीटरची परेड; गुन्हेगारीपासून दूर राहण्याच्या सूचना

बोरद पोलीस दूरक्षेत्राच्या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेल्या तसेच सध्या जामिनावर बाहेर असलेल्या हिस्ट्रीशीटरची परेड घेतली. यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये, कायद्याचे उल्लंघन करू नये आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अशा व्यक्तींवर नियमित लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने या परेडला महत्त्व प्राप्त झाले आहे. याप्रसंगी दूरक्षेत्राला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गाव व परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती जाणून घेत स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली. परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *