तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मान्यताप्राप्त परदेशी शिक्षण संस्था किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या अथवा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत परदेशातील जागतिक क्रमवारीत २०२६ च्या अद्ययावत यादीत पहिल्या २०० मध्ये समाविष्ट असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ही मर्यादा क्रमाने ३०० पर्यंत शिथिल करण्यात येणार आहे.
उमेदवार व त्यांचे आई-वडील किंवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या पालकांचे तसेच उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ही उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल.
या शिष्यवृत्ती योजनेत एकूण ४० पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ व निवड कार्यपद्धती याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून आवश्यक मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करावीत. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाबाबतची सर्व माहिती व सूचना अर्जात नमूद केलेल्या ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहेत.
या योजनेचा जास्तीत जास्त लाभ पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी केले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




