अक्कलकुवा अक्राणी खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक स्थानिक वार्ता

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ३२३ गावांमध्ये  लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’

तळोदा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यक्षेत्रात ११ ते १८ नोव्हेंबर  दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील ३२३ गावांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, प्रकल्प अधिकारी लघीमा तिवारी, तळोदा तहसीलदार दीपक धिवरे, अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड, उत्तम राऊत, गटविकास अधिकारी काशिनाथ पवार, नियोजन अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिश्चंद्र कोकणी आदी उपस्थित होते.
          पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले की, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून देशभरात उत्साहात साजरी होणार असून, नंदुरबार येथील नियोजन भवनात मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडेल. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तळोदा प्रकल्पांतर्गत दोन आश्रमशाळांची इयत्ता ११ वी व १२ वीपर्यंत श्रेणीवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाह्यस्रोताद्वारे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असून, ‘नीट’ सारख्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना यश मिळावे, या उद्देशाने ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत विशेष अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले आहेत.
      आमदार आमशा पाडवी यांनी या सप्ताहांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रम व योजनांमध्ये तळागाळातील आदिवासी बांधवांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनाने व यंत्रणेने प्रामाणिकपणे काम करावे आणि योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे सूचित केले. प्रकल्प अधिकारी लघीमा तिवारी यांनी या सप्ताहांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. या लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले.

  सेवा सप्ताहातील कार्यक्रम व नियोजन
* दि. १३ नोव्हेंबर : केंद्रवर्ती अर्थसंकल्प  योजनेंतर्गत मार्गदर्शन व २०२५-२६ मधील निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ वाटप.
* दि. १४ नोव्हेंबर  : तिन्ही तालुक्यांतील महापुरुषांच्या स्मारकांची व पुतळ्यांची स्वच्छता, दीपोत्सव आणि लोककला व पारंपरिक संस्कृती दर्शनाचे कार्यक्रम, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आश्रमशाळा मुख्याध्यापक, वसतिगृह गृहपाल व ३२३ गावांतील आदि स्वयंसेवक या कार्यक्रमाचे समन्वय करतील.
* दि. १५ नोव्हेंबर : नंदुरबार नियोजन भवनात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन व ३२३ गावांतील आदिवासी सेवा केंद्रांवर पूजन. तसेच या वेळी खालील उपक्रम होतील :
   * नवीन आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपये अर्थसहाय्य व वैयक्तिक लाभार्थ्यांना योजनांचे वाटप.
   * वैदू भगतांचा सत्कार, उत्कृष्ट मुख्याध्यापकांचा गौरव, वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ७/१२ व ८-अ उतारे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर.
* दि. १६ नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर तहसीलदारांमार्फत सेतू शिबिरातून आधार दुरुस्ती व जातीचा, उत्पन्नाचा, रहिवासी दाखला वाटप. तसेच कृषी विभागामार्फत शेतकरी नोंदणी व पीकविमा ऑनलाइन सेवा.
* दि. १७ नोव्हेंबर : आरोग्य विभागामार्फत गावोगावी रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल तपासणी शिबिरे. तसेच अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण मार्गदर्शन.
* दि. १८ नोव्हेंबर : सर्व शासकीय विभागांच्या उपक्रमांचा आढावा घेऊन एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *